मुंबई : मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने नवी मुंबईतील तुर्भे परिसरात अवैधरित्या इंधन काढण्याच्या प्रकारावर मोठी कारवाई करत सुमारे ९४ लाख ३६ हजार ७०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २ टँकर, १४ हजार लिटर डिझेल आणि २५ हजार लिटर पेट्रोलियमसदृश द्रवपदार्थ ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी ५ आरोपींविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनियंत्रक शिधावाटप अंमलबजावणी गणेश बेल्लाळे यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. तपासादरम्यान डिझेल वाहतूक करणाऱ्या एका टँकरच्या आउटलेटमधून अवैधरित्या इंधन काढून ते दुसऱ्या टँकरमध्ये भरले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भरारी पथकाने तातडीने धाड टाकली. त्यानंतर दोन्ही टँकरसह त्यामधील इंधनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध इंधन व्यवहारांवर मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणात दोन्ही टँकरचे चालक, मालक तसेच संबंधित व्यावसायिकाशी संबंधित व्यक्तीसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास तुर्भे पोलीस करीत आहेत. या कारवाईत सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप निरीक्षक अमोल बुरटे, दिपेंद्र परुळेकर, राहुल इंगळे आणि विकास नागदिवे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच बेलापूर शिधावाटप कार्यालयाच्या शिधावाटप अधिकारी छाया पालवे यांच्यासह निरीक्षक प्रकाश पराते, सचिन हेंबाडे, विक्रम धुमाळ आणि सागर गराडे यांनीही कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. अवैध इंधन साठवणूक आणि विक्रीविरोधात भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

