रायगड : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील गिरवले येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीवर मोठी कारवाई करत सुमारे १० लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीत विविध कंपन्यांचे एकूण १३६ गॅस सिलेंडर, एक टेम्पो आणि एक मोटार ताब्यात घेण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकाने गिरवले येथे अचानक धाड टाकली असता विविध आकारांचे भरलेले व रिकामे गॅस सिलेंडर कोणतीही अधिकृत परवानगी नसताना साठवून ठेवल्याचे उघड झाले. जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरमध्ये १९ किलोचे १४ आणि १५ किलोचे ४ भरलेले, तसेच १९ किलोचे ४, १५ किलोचे ११२ आणि ५ किलोचे २ रिकामे सिलेंडर यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे अवैध गॅस साठवणूक आणि वितरणाच्या प्रकाराला मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. कारवाईत सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, पनवेल निरीक्षण अधिकारी अश्विनी धनवे, तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, अरुण काते, राजेश सोरते, देवानंद थोरवे, रवींद्र राठोड आणि पवन कुंभले यांनी सहभाग घेतला. अन्न व नागरी पुरवठा विभागाने अवैध गॅस साठवणूक, काळाबाजार आणि अनधिकृत वितरणाविरोधात अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली अथवा अवैध गॅस साठ्याची माहिती तातडीने संबंधित प्रशासनाला देण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

