मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांच्या जीवनातील विविध पैलू प्रभावीपणे मांडणारे ‘उजेडाच्या वाटेवर’ हे विशेष छायाचित्र प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित करण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी ही माहिती दिली. हे प्रदर्शन ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणाला समर्पित असलेल्या या प्रदर्शनात विविध आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरांतील महिलांच्या जीवनातील वास्तव, त्यांचे संघर्ष, यश, स्वप्ने आणि दैनंदिन अनुभव छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. स्त्री जीवनातील अनेक अनोळखी पैलूंना उजाळा देणारे हे प्रदर्शन समाजात महिलांविषयी अधिक संवेदनशील, सकारात्मक आणि समतोल दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातून महिलांसमोरील विविध आव्हाने, त्यांची जिद्द, आत्मविश्वास आणि समाजातील योगदान प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून स्त्रियांच्या अनुभवांचे वास्तव दर्शन घडवत सामाजिक जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या आयुष्यातील विविध पैलू समजून घ्यावेत, तसेच महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन महिला सन्मान, समानता आणि सामाजिक जागरूकतेचा प्रभावी संदेश देणारे ठरत असून नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

