नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. भारतीय टपाल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ उपक्रमांतर्गत नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ या पवित्र स्थळांवर आधारित विशेष टपाल तिकिटांची निर्मिती करण्यात आली आहे. या विशेष तिकिटांचे अनावरण ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ महाकुंभाच्या ध्वजारोहण सोहळ्यात करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे सिंहस्थ महाकुंभाची आध्यात्मिक परंपरा, नाशिक-त्र्यंबकेश्वरचा ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक महत्त्व देशभर पोहोचण्यास मदत होणार आहे. वैष्णव परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे रामकुंड आणि शैव परंपरेचे प्रतीक असलेले कुशावर्त तीर्थ या दोन्ही स्थळांची निवड करून सिंहस्थाच्या विविध धार्मिक परंपरांचा गौरव करण्यात आला आहे. रामकुंडाच्या ऐतिहासिक वास्तू, पवित्र स्नानस्थळ म्हणून असलेले महत्त्व आणि सिंहस्थाशी असलेले नाते तसेच कुशावर्त तीर्थाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगांची पार्श्वभूमी या विशेष टपाल तिकिटांवर साकारण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होणार असून, भावी पिढ्यांसाठी हा सांस्कृतिक वारसा जतन करण्यालाही हातभार लागणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सिंहस्थ महाकुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या समृद्ध आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर आधारित टपाल तिकिटांमुळे या पवित्र स्थळांची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. टपाल तिकिटे ही केवळ पत्रव्यवहाराचे साधन नसून देशाचा इतिहास, संस्कृती आणि वारसा जतन करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सिंहस्थ महाकुंभाच्या परंपरेचे दस्तऐवजीकरण होण्याबरोबरच धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यात या विशेष टपाल तिकिटांचे अनावरण होताच सिंहस्थ महाकुंभ २०२७ च्या तयारीला सांस्कृतिक वारशाची नवी दिशा मिळणार असून, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची आध्यात्मिक ओळख देशभर अधिक ठळकपणे पोहोचणार आहे.

