मुंबई : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सुलभ आणि एकात्मिक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत शिवाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्ट म्हणून विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या प्रकल्पामुळे शिवाजीनगर मेट्रो स्थानक, रेल्वे स्थानक आणि एसटी बसस्थानक यांची एकात्मिक जोडणी होणार असून, पुणेकरांसह राज्यभरातील प्रवाशांना आधुनिक, जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. शिवाजीनगर येथील एसटीच्या सुमारे १५ हजार ४०० चौरस मीटर जागेचा विकास करण्यात येणार असून, त्यापैकी ४ हजार ९०० चौरस मीटर जागेवर मेट्रो स्थानक उभारण्यात आले आहे. उर्वरित सुमारे १० हजार ५०० चौरस मीटर जागेवर अत्याधुनिक बस पोर्ट, व्यावसायिक संकुल आणि आवश्यक प्रवासी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार असून महामेट्रो ही प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम पाहणार आहे.
प्रस्तावित बस पोर्टमध्ये आधुनिक एसटी टर्मिनस, बस आगार, पार्किंग, कार्यालयीन व व्यावसायिक जागा तसेच प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मेट्रो आणि रेल्वे स्थानकाशी थेट जोडणीमुळे हे केंद्र बहुविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान शिवाजीनगर एसटी बसस्थानक तात्पुरते वाकडेवाडी येथील आरे डेअरीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले असून, तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवीन बस टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर एसटी सेवा पुन्हा मूळ ठिकाणी सुरू होणार आहे. या संयुक्त विकास प्रकल्पात एसटी महामंडळाच्या जमिनीचे मूल्य आणि गुंतवणुकीचा वाटा लक्षात घेऊन महसूल वाटप निश्चित केले जाणार असून, महामेट्रोला प्रकल्प खर्चाच्या चार टक्के पर्यवेक्षण शुल्क मिळणार आहे. ४९ अधिक ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्याच्या नियोजनासह शासनाच्या नियमांनुसार प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. एसटीच्या मालमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पन्न वाढवणे, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणे आणि मेट्रो, रेल्वे व एसटी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणे हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

