मुंबई : राज्यात दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात होत असताना बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भाग दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा मुंबईतील शिवाजी पार्क येथे दरवर्षी आयोजित केला जाणारा पारंपरिक दीपोत्सव रद्द करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हिडिओद्वारे त्यांनी हा निर्णय जाहीर करत, दुष्काळामुळे होरपळणाऱ्या राज्यातील बांधवांचे दुःख लक्षात घेता मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करणे योग्य वाटत नसल्याचे सांगितले. राज्यातील ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई, शेतीचे मोठे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील संकट पाहता प्रत्येकाने त्यांच्या वेदनांची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. शहरांमध्ये मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला, तर दुष्काळग्रस्त कुटुंबांना आणि त्यांच्या मुलांना काय वाटेल, याचाही विचार समाजाने करावा, असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या दुष्काळाच्या गंभीरतेचाही उल्लेख करत, यंदाची परिस्थिती १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण ठरू शकते, असे सांगितले. मात्र, त्यांनी नागरिकांना दिवाळी साजरी न करण्याचे आवाहन केलेले नसून, सण साधेपणाने आणि संवेदनशीलतेने साजरा करण्याची विनंती केली आहे. कंदील लावा, फराळ वाटा आणि कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घ्या; मात्र मोठ्या प्रमाणावरील रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी टाळा, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने संकटात असलेल्या बांधवांची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले. दरवर्षी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या भव्य दीपोत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत असतात. मात्र, यंदा दुष्काळग्रस्तांच्या परिस्थितीचा विचार करून हा उत्सव रद्द करण्यात आला असून, पुढील वर्षी परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा जल्लोषात दीपोत्सव साजरा करण्याची आशा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयाची राज्यभरात चर्चा सुरू असून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

