मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात येत्या गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्तींची विक्री आणि खरेदी होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईतील गणेश मूर्तीकरांना पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यास मज्जाव केल्यानंतर आता मुंबईबाहेरुन येणाऱ्या गणेशमूर्तींनाही शहरात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून कोकण विभागीय आयुक्तांना तसे पत्रही देण्यात आले आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. यासंदर्भात उच्च न्यायालयाने ३० जानेवारी २०२५ रोजी घातलेले निर्बंध आणि पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये केलेल्या सूचनांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.






