मुंबई : दक्षिण मुंबईतील मशीद बंदर परिसरात बनावट विदेशी सिगारेट आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा बेकायदा साठा करून त्यांची विक्री केली जात असल्याचा प्रकार पायधुनी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. २८ ऑक्टोबर रोजी मशीद बंदर पश्चिम येथील हॉटेल स्टार्सवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ७२ लाख २१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी १९ जणांना अटक करण्यात आली आहे. पायधुनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला गस्तीदरम्यान हॉटेल स्टार्समध्ये विदेशी सिगारेट आणि ई-सिगारेटचा मोठा बेकायदा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकून संपूर्ण परिसराची तपासणी केली. या कारवाईदरम्यान तेथे सिगारेट आणि ई-सिगारेटची साठवणूक तसेच वितरणाशी संबंधित व्यवहार सुरू असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर माल जप्त केला. छाप्यात विदेशी बनावटीच्या ११ हजार ७१० सिगारेटची पाकिटे आणि २ हजार १७२ इलेक्ट्रॉनिक सिगारेट हस्तगत करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या सर्व मालाची अंदाजित किंमत ७२ लाख २१ हजार ५५० रुपये इतकी आहे. प्राथमिक तपासात या विदेशी सिगारेट बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांचे उत्पादन नेमके कुठे झाले, त्या कोणाकडून पुरविण्यात आल्या आणि त्यांचे वितरण कोणत्या नेटवर्कद्वारे केले जात होते, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या प्रकरणामागे मोठे अवैध वितरण रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता लक्षात घेऊन तपासाचा विस्तार करण्यात आला आहे.
या प्रकरणात २० ते ४८ वयोगटातील एकूण १९ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारने २०१९ मध्ये लागू केलेल्या कायद्यानुसार ई-सिगारेटचे उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर संपूर्ण बंदी घातली आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय जप्त करण्यात आलेल्या विदेशी सिगारेट बनावट असल्याचा संशय असल्याने त्यांचा पुरवठादार, उत्पादक आणि विक्रीसाठी वापरले जाणारे संपूर्ण जाळे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. या बेकायदा व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही तपास सुरू असून, पुरवठा साखळीतील इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बनावट तंबाखूजन्य उत्पादनांवर आणि प्रतिबंधित ई-सिगारेटच्या अवैध व्यापारावर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे मुंबईतील बनावट विदेशी सिगारेट आणि ई-सिगारेटच्या अवैध विक्रीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, या प्रकरणातील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी तपास यंत्रणा पुढील चौकशी करत आहे.

