पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून, १ नोव्हेंबरपासून ६० वर्षे आणि त्यावरील नागरिकांना बस तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ‘पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर हा निर्णय लागू करण्यात आला असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील सर्व बस मार्गांवर ही सवलत उपलब्ध असेल. यापूर्वी पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिकांना दैनिक बस पासवर ५० टक्के सवलत दिली जात होती. ७० रुपयांचा दैनिक पास ३५ रुपयांत उपलब्ध करून देण्याची योजना आधीपासूनच सुरू होती. आता त्याचबरोबर नियमित प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना थेट तिकिटावरही अर्ध्या दराची सवलत मिळणार आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी पूर्ण तिकीट काढण्याची गरज राहणार नाही. पीएमपी प्रशासनाच्या मते, या निर्णयामुळे दवाखान्यात जाणे, बाजारपेठेत खरेदी करणे, नातेवाईकांकडे जाणे-येणे किंवा इतर कामांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही सवलत त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार असून, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यासही मदत होईल, असा विश्वास पीएमपी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवासादरम्यान वयाचा पुरावा सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाभार्थी नागरिकांनी ६० वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पीएमपीचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, आधार कार्डवर संपूर्ण जन्मतारीख नमूद असणे आवश्यक असून, केवळ जन्मवर्ष नमूद असलेले आधार कार्ड या सवलतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांना या कागदपत्रांच्या आधारेच अर्ध्या दरात तिकीट दिले जाणार आहे. पीएमपीच्या सर्व बस मार्गांवर ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याने शहर आणि उपनगरांमध्ये नियमित प्रवास करणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक परवडणारी होण्यास मदत होईल, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि किफायतशीर बनेल, असा विश्वास पीएमपी प्रशासनाने व्यक्त केला आहे. ‘या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा आणि सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिक वापर करावा,’ असे आवाहन पीएमपीच्या मुख्य वाहतूक व्यवस्थापकांनी निवेदनाद्वारे केले आहे.

