पुणे : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना स्वच्छ, शाश्वत आणि हरित वाहतूक व्यवस्था उभारणे ही महाराष्ट्राची प्रमुख प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योग वेगाने विस्तारत असून पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे ईव्ही उद्योगाची महत्त्वाची केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. आगामी काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समूहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, बी. एल. संतोष, ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, ईकेए मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, सुनंदा मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास प्रदूषण कमी होण्याबरोबरच जीवाश्म इंधनावरील आयातही घटेल. ऑटोमोबाईल उद्योग हा रोजगारनिर्मिती, पूरक उद्योगांचा विकास आणि औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याला पुढील तीन वर्षांत सुमारे ५० हजार इलेक्ट्रिक बसांची आवश्यकता भासणार असल्याने ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले. इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा विस्तार हा केवळ औद्योगिक विकासापुरता मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगतीसाठीही महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरासाठी हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यावर राज्य सरकार विशेष भर देत असून, भविष्यात वीज निर्मितीमध्ये हरित ऊर्जेचे प्रमाण वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी राज्यभर सक्षम चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी सरकारने सर्वंकष आराखडा तयार केला असून, वाहन उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने प्रमुख महामार्गांवर चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागा, परवानग्या आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकार स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिनॅकल समूहाच्या उत्पादन सुविधेमध्ये सुमारे ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक कर्मचारी हा कंपनीचा भागधारक असण्याचे मॉडेलही कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांसाठी किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, नव्या उत्पादन सुविधांमुळे महाराष्ट्रातील वाढती ईव्ही मागणी राज्यातच पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पूरक उद्योगांचा विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि हरित वाहतूक व्यवस्थेच्या विस्ताराला गती मिळेल. राज्य सरकारच्या धोरणात्मक सहकार्यामुळे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात देशात अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

