पालघर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील भोपोली येथे बनावट कॉल सेंटर चालवून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ₹२१ लाख ८३ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बंगल्यात बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती पालघर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री छापा टाकला. तपासात आरोपी अमेरिकेतील नागरिकांना त्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस असल्याचे खोटे संदेश पाठवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर बँक खात्यातील रक्कम सुरक्षित करण्याच्या बहाण्याने संबंधितांना गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडून त्या कार्डचे कोड रिडीम करून आर्थिक फसवणूक केली जात होती. उर्वरित रक्कम हवाला व्यवहारातून मिळविली जात असल्याचाही तपासात खुलासा झाला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ७ लॅपटॉप, १४ मोबाईल फोन, ४ हेडफोन, १ राउटर, एक फॉर्च्युनर कार आणि एक रॉयल एनफिल्ड मोटारसायकल असा एकूण ₹२१.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला असून, अशा सायबर गुन्ह्यांविरोधात पालघर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

