नवी मुंबई : काही महिन्यांपासून उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील खाडी परिसरात रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगोंचे मोठ्या प्रमाणात आगमन सुरू झाले असून, ऐरोली, घणसोली आणि वाशी परिसरात गुलाबी रंगांची मोहक झळाळी पसरल्याचे चित्र दिसत आहे. पाण्यात शांतपणे फिरणारे, थव्याने उडणारे आणि अन्न शोधताना विशेष हालचाली करणारे हे पक्षी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी या दृश्याचा आनंद घेण्यासाठी पक्षीप्रेमी, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने खाडीकिनारी येत असून, अनेकजण या सुंदर क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील खाडी भाग पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
दरवर्षी साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून फ्लेमिंगोंचे आगमन सुरू होते, मात्र यंदा त्यांच्या येण्यास उशीर झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत होती. हवामानातील बदल, पाण्याची गुणवत्ता, अन्नसाखळीतील बदल तसेच वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांच्या स्थलांतराच्या वेळेत बदल झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच शिवडी परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाढलेला आवाजही त्यामागील एक कारण मानले जात होते. दरम्यान, ऐरोली खाडी भागात गेल्या दोन आठवड्यांत सुमारे १० ते १५ हजार फ्लेमिंगो दिसून आल्याची माहिती स्थानिक बोट चालक आणि पक्षीप्रेमी शहबाज बामने यांनी दिली आहे. काही ठिकाणी छोटे गट तर काही ठिकाणी मोठे थवे दिसत असून, येत्या एप्रिल-मे महिन्यात त्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे हा परिसर पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.







