मुंबई : मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि प्रसूतीगृहांतील आंतररुग्णांना दोन्ही वेळचे जेवण, चहा-नाश्ता पुरवण्यासाठी कडधान्य, भाजीपाला, फळे, दूध, अंडी आणि इतर खाद्यसाहित्य खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या खरेदीसाठी कडधान्य, साखर, बासमती तांदूळ, शेंगदाणा तेल आदींसाठी ८.७७ कोटी रुपये, तर भाजीपाला, फळे, दूध, चपाती आणि इतर साहित्यांसाठी ४८.४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, निविदेत काही भाज्यांचे आणि इतर वस्तूंचे दर बाजारभावापेक्षा अत्यंत कमी असल्याने समिती सदस्यांनी त्यांच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या.
काही सदस्यांनी रुग्णांना दिले जाणारे अन्न सकस आणि गुणवत्तापूर्ण असल्याची खात्री करण्यासाठी महापालिकेच्या भांडार विभागाची अचानक तपासणी करावी, अशी मागणी केली. तसेच रुग्णालयांमध्ये तयार होणाऱ्या जेवणाची चव आणि गुणवत्ता तपासण्यासाठी संबंधित अधिकारी व परिचारिकांनी प्रथम ते अन्न चाखावे, त्यानंतरच रुग्णांना ते दिले जावे, अशी सूचनाही करण्यात आली. रुग्णांसाठी बासमती तांदळाची खरेदी होत असली तरी प्रत्यक्षात तो वापरला जात नसल्याचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला. बैठकीत विविध पक्षांच्या सदस्यांनी निविदा प्रक्रिया, पुरवठादारांचा दर्जा आणि खरेदीतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. मागील तीन वर्षांतील खरेदीचा तपशील, पुरवठादारांची माहिती आणि खर्चाचा हिशोब सादर करण्याची मागणी करण्यात आली. काही सदस्यांनी महापालिकेच्या रुग्णालयांच्या परिसरातच भाजीपाला लागवड करून ताजा भाजीपाला उपलब्ध करण्याचा प्रस्तावही मांडला. तर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा पुरवठा होत असल्यास त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी २००० सालापासून अशाच पद्धतीने खरेदी होत असून, एपीएमसीतील वार्षिक सरासरी दराच्या आधारे निविदा काढल्या जातात, असे स्पष्ट केले. रुग्णांसाठीचे अन्न आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले जाते आणि अन्न व औषध प्रशासनाकडून कोणत्याही वेळी तपासणी केली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. चर्चेनंतर स्थायी समितीने सर्व उपसूचना फेटाळून मूळ खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली.

