मुंबई : आयआयटी बॉम्बेने परीक्षेतील गैरप्रकार हाताळण्याच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचे बदल करत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थ्याकडे मोबाइल किंवा इतर परवानगी नसलेले साहित्य आढळल्यास त्याला तात्काळ दोषी ठरवले जाणार नाही. परीक्षा निरीक्षक संबंधित साहित्य जप्त करून घटनेची नोंद करेल आणि विद्यार्थ्याला नवीन उत्तरपत्रिका देऊन उर्वरित पेपर पूर्ण करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर उपलब्ध पुरावे, निरीक्षकाचा अहवाल आणि विद्यार्थ्याची बाजू विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्याला लेखी स्पष्टीकरण देण्याची संधीही असेल आणि त्याने बाजू मांडली नाही म्हणून आरोप मान्य केल्याचा अर्थ लावला जाणार नाही. गरज भासल्यास विद्यार्थ्याला समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. बी.टेक. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमांवर आक्षेप घेत आंदोलन केले होते. त्यानंतर ऑक्टोबरमधील विशेष सिनेट बैठकीत जुलै २०२६ मध्ये लागू करण्यात आलेले कठोर नियम तात्पुरते मागे घेऊन एप्रिल २०१५ मधील कार्यपद्धती पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०१५ च्या नियमांनुसार केवळ मोबाइल जवळ आढळल्यास आणि प्रत्यक्ष कॉपी केल्याचे सिद्ध झाल्यास होणाऱ्या शिक्षेमध्ये स्पष्ट फरक करण्यात आला होता. मात्र जुलै २०२६ मधील नियमांमध्ये मोबाइल आढळल्यासही विद्यार्थ्याला ‘एफआर’ (फेल अँड रिपीट) श्रेणी किंवा निलंबनाची तरतूद होती. नव्या कार्यपद्धतीत परीक्षा निरीक्षकाचे काम केवळ घटना नोंदवणे आणि पुरावे जतन करणे इतकेच राहणार असून अंतिम निर्णय विभागीय शैक्षणिक शिस्तभंग कृती समिती (डीए-डीएसी) घेणार आहे. समिती पुरावे, उत्तरपत्रिका आणि जप्त साहित्याचा सखोल अभ्यास करून गैरप्रकाराचे स्वरूप व शिक्षेबाबत शिफारस करेल. पुरावे अपुरे असल्यास विद्यार्थ्याला संशयाचा फायदा दिला जाईल. परीक्षा कक्षात मोबाइल, स्मार्टवॉच, इअरफोन व अन्य प्रतिबंधित साहित्य नेण्यास बंदी कायम राहणार असून, परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रवेशाची वेळ, स्वच्छतागृहासाठी नियंत्रण आणि सीसीटीव्ही निरीक्षणासारख्या उपायांचाही विचार करण्यात आला आहे. या बदलांमुळे परीक्षेतील शिस्त अबाधित ठेवतानाच विद्यार्थ्यांना न्याय्य संधी आणि मानसिक आधार देण्यावर आयआयटी बॉम्बेने भर दिला आहे.

