पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सुरू असलेल्या सीआयडी तपासाला गती देण्याची तसेच तो पारदर्शक आणि जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती हवाई पट्टीजवळ झालेल्या या भीषण विमान अपघाताला नऊ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी पुण्यातील सीआयडी मुख्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आमदार विक्रम काकडे यांच्यासह त्यांनी तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कारवाई, प्रलंबित बाबी आणि अंतिम अहवाल कधी येणार याबाबत सविस्तर माहिती घेतली. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी यावेळी केंद्र सरकारच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडून अपघाताचा प्राथमिक तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती दिली. अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अपघाताचे नेमके कारण समोर येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जय पवार यांनी यावेळी नमूद केले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जय पवार म्हणाले की, या अपघाताचे सत्य समोर येणे हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाशी संबंधित विषय आहे. अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका असल्याने प्रत्येक पैलूचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तपासादरम्यान कोणाचाही निष्काळजीपणा किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अपघातामागील सत्य पूर्णपणे समोर येईपर्यंत या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र, सध्या या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीमार्फतच सुरू असून, अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासातील पारदर्शकता आणि निष्कर्षांमुळे या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

