नवी दिल्ली : काळानुरूप होणारे बदल आत्मसात करत रेल्वे विभागानंही हे बदल प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी लागू केले. दैनंदिन रेल्वे प्रवासासमवेत भारतीय रेल्वेनं लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासातील काही नियमांमध्येसुद्धा बदल केले. याच बदलांचं आणखी एक नवं पर्व म्हणून पाहिली जाणारी देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, एका जबरदस्त प्रवासाचा अनुभव अनेकांनाच देणार आहे. तत्पूर्वी या प्रवासासंदर्भातील एक मोठी आणि तितकीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, वंदे भारत स्लीपर ट्रेननं आरएसी किंवा वेटिंग लिस्ट तिकीटाची चिंताच प्रवाशांना राहणार नाहीये. उपलब्ध माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जानेवारी २०२६ रोजी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यासोबतच भारतीय रेल्वे प्रवासात लांब पल्ल्यांच्या रेल्वे मार्गावर एक नवं पर्व सुरू होणार असून देशाच्या रेल्वे विभागात त्यामुळं एक नवं योगदान दिलं जाणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एकतर तुम्हाला या रेल्वेचं तिकीट मिळेल किंवा तिकीट मिळणारच नाही. थोडक्यात आरएसी, वेटिंग लिस्ट अशी तिकीटं या प्रवासाठी लागू राहणार नसून फक्त कन्फर्म तिकीटं असणाऱ्यांनाच या रेल्वेनं प्रवास करता येणार आहे. थोडक्यात सीट शेअर करणं, प्रतीक्षा यादीत राहठणं, तिकीट कन्फर्म होण्याची वाट पाहणं अशी चिंताच मिटणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार या निर्णणामुळं प्रवाशांना रेल्वे प्रवास करताना Confirm बर्थ मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. मुख्यत्वे लांब पल्ल्याच्या प्रवासाठी या नियमाचा फायदा होणार आहे.







