मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीने किंवा लोकलने प्रवास करून दमलेल्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रिलॅक्स झोन’ सुरू करण्यात आला आहे. या ‘रिलॅक्स झोन’मध्ये मसाज खुर्च्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईकरांचा दररोजचा रेल्वे प्रवास धकाधकीचा असतो.
प्रवाशांना प्रवासादरम्यान विविध समस्यांचा सामना करावा लागतो. लोकल प्रवासात बराच वेळ उभे राहून गुडघे आणि पाय प्रचंड दुखतात. अनेक प्रवासी दरवाज्याला लटकून प्रवास करतात. त्यामुळे त्यांचे हात दुखतात. लोकलमधील गर्दी, धक्काबुक्कीमुळे अनेकांना त्रास होतो. तसेच मेल-एक्सप्रेसमधील प्रवास हा पाठदुखी, अंगदुखीला आमंत्रण देते. प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अत्याधुनिक ‘रिलॅक्स झोन’ सुरू केला आहे. क्विक रेस्टद्वारे व्यवस्थापित ही नवी सुविधा थकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून उपलब्ध करण्यात आली असून, यात संपूर्ण शरीरासाठी मसाज खुर्च्या उपलब्ध आहेत.







