नवी दिल्ली : आता सिग्नल तोडणं किंवा कोणतेही वाहतुकीचे नियम तोडणं चांगलंच महागात पडणार आहे. जर एका वर्षात तुम्ही पाचवेळा वाहतुकीचे नियम मोडले तर तुमचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यासाठी रद्द होऊ शकतं. ही ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूद दळणवळण मंत्रालयाच्या नवीन मोटर व्हेइकल सुधारणा नियमात करण्यात आल्याचे वृत्त आहे. वाहन चालक परवाना संबंधीचे आरटीओ किंवा जिल्हा ट्रान्सपोर्ट ऑफिस यांना याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहे. या नव्या तरतुदीनुसार आरटीओ किंवा जिल्हा ट्रान्सपोर्ट ऑफिसने चालकाचा परवाना रद्द करण्यापूर्वी परवाना धारकाची बाजू ऐकून घेतली पाहिजे. या नवीन नियमाचे नोटीफिकेशन बुधवारी काढण्यात आले आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर चालक परवाना रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावनी ही १ जानेवारीपासून लागू झाली आहे.
नवीन नोटिफिकेशननुसार एका वर्षापूर्वी मोडलेला वाहतुकीचा नियम किंवा गुन्हा हा पुढच्या वर्षी ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या घडीला २४ असे नियम आहेत ज्यामुळे संबंधीत अधिकारी तुमचा वाहन परवाना रद्द करू शकतो. यात वाहन चोरी, प्रवाशावर हल्ला, प्रवाशाचे अपहरण. वेगाची मर्यादा ओलांडलणे, मर्यादेपेक्षा जास्त सामान गाडीत भरणे, सार्वजनिक ठिकाणी वाहन बेवारस स्थितीत सोडून जाणे या नियमांचा देखील समावेश आहे. मात्र आता नव्या तरतुदीनुसार पाच वाहतुकीसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये हेलमेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल मोडणे या सारख्या तुलनेनं कमी तीव्रतेच्या गुन्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला. त्यामुळे हे साधे वाटणारे नियम जरी मोडले तरी तुमचा वाहन परवाना रद्द होऊ शकतो. वर्षात पाचवेळा वाहतुकीचे नियम मोडल्यावर वाहन परवाना रद्द ही तरतुद योग्य दिशेला जाणारी आहे. मात्र लोकं धोकादायक पद्धतीनं वाहन चालवतात हे ट्रॅफिक पोलिसांच्या नजरेत येत नाहीत त्याबाबत काय. याबाबत एसओपीचा अभाव आहे. तसेच सीसीटीव्हीत कैद झालेले वाहतुक उल्लंघनाची प्रकरणे ही अनेकवेळा न्यायालयात आव्हान दिले जाते.






