नागपूर (सतीश भालेराव) : शहरात बंदुकीच्या धाकावर खंडणी उकळणे आणि बारमध्ये दरोडा घालण्याच्या गंभीर गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने ६ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, चाकू, फोल्डिंग स्टील रॉड, चारचाकी कार तसेच विदेशी ब्रँडच्या दारूच्या बाटल्या असा सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी नागपूरमधील संगम रोड परिसरातील एका बारमध्ये आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत बार मॅनेजरकडे खंडणीची मागणी केली. तसेच बारमधील काउंटरमधील रोख रक्कम आणि विदेशी दारूच्या बाटल्या जबरदस्तीने घेऊन आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक एक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे वानाडोंगरी परिसरातील एका घरावर छापा टाकून चार आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित रमेश सातपुते, प्रीतम उर्फ मोंटी राम बोकरडे, हर्षल प्रमोद उपरीकर, विकास रणजित गिरसावळे, तसेच राकेश झकल्लाळ पाटील आणि अखिलेश रामजी पांडे यांचा समावेश आहे. यापैकी मुख्य आरोपी अजित सातपुते याच्यावर नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असून एका प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो पॅरोलवर बाहेर येऊन बराच काळ फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत आरोपींकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी चाकू, फोल्डिंग स्टील रॉड, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आणि विदेशी ब्रँडच्या दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त सिंगा रेडी ऋषिकेश रेड्डी परिमंडळ क्रमांक १ यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन तसेच सपोसी संजय बनसोड, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राऊत, पोलीस उपनिरीक्षक पंकज सयाम, पोलीस उपनिरीक्षक अक्षय गवांदे, पोलीस हवालदार राजेश वरठी, पोलीस हवालदार विजय जाने, पोलीस हवालदार धर्मेंद्र यादव, पोलीस हवालदार दीपक ठाकूर, देशमुख ना विक्रांत देशमुख, पोशि मनोज सोनवणे, पोशि किरण शेजवळ, पोशि सचिन सोनवणे, पोशि वरिष्ठ इंगळे, पोशि मुरलीधर केवटी, पोशि अमित चौरे, पोशि विवेक झाडे या पथकाने केली आहे.






