मुंबई : मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने हवा प्रदूषणात भर टाकणाऱ्या बेकऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे पीएम-१० प्रदूषणात सुमारे ३.५ टक्के भर पडत असल्याने अशा बेकऱ्यांना स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. मात्र, वारंवार नोटिसा देऊनही अनेक बेकऱ्यांनी नियमांचे पालन न केल्याने आता अशा बेकऱ्या कोणतीही पूर्वसूचना न देता थेट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने २०२४ मध्ये २८ मुद्द्यांची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली असून, बांधकामस्थळांवरील नियमभंग, रस्त्यांवरील धूळ, कचरा जाळणे आणि राडारोड्याची अयोग्य विल्हेवाट यांसारख्या प्रकारांवरही कारवाई सुरू आहे. सध्या मुंबईतील एकूण ५९३ बेकऱ्यांपैकी ३५४ बेकऱ्या लाकूड व कोळशावर कार्यरत आहेत. त्यापैकी १७५ बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाचा स्वीकार केला असून ६९ बेकऱ्यांचे रूपांतर सुरू आहे. तसेच ८ बेकऱ्या बंद झाल्या असून ८७ बेकऱ्या अनधिकृतपणे सुरू असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे.
स्वच्छ इंधनाचा वापर वाढवण्यासाठी महापालिकेकडून जनजागृतीही केली जात आहे. मात्र, अनेक बेकरी चालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट बंदची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. दुसरीकडे, पारंपरिक इंधनावरून स्वच्छ इंधनाकडे वळण्यासाठी बेकरीतील यंत्रणा व सुविधा बदलण्याचा खर्च सुमारे २० लाख रुपये येत असल्याचे बेकरी चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अचानक व्यवसाय बंद झाल्यास आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तरीही शहरातील हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी प्रदूषण करणाऱ्या बेकऱ्यांवर कठोर कारवाई अपरिहार्य असल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

