डोंबिवली : आरोग्य, मैत्री आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’ या लोकप्रिय उपक्रमाचे तिसरे पर्व येत्या २९ नोव्हेंबर २०२६ रोजी रंगणार असून, यंदा तब्बल १० हजार धावपटूंना सहभागी करून घेण्याचे लक्ष्य आयोजकांनी ठेवले आहे. ‘डोंबिवली शहराचा उत्सव’ या संकल्पनेवर आधारित या रनचे आयोजन कल्याण डोंबिवली रनर्स (KDR) आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. दुर्गाष्टमीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘नमो रमो नवरात्री’ प्रांगणात स्पर्धेच्या थीम टी-शर्ट आणि फिनिशर मेडलचे अनावरण करण्यात आले. शहरातील नागरिकांना एकत्र आणणे, राज्यभरातील धावपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि फिटनेसबाबत जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मागील दोन पर्वांत सुमारे सहा हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. यंदा २१.१ किमी, १० किमी आणि ५ किमी टाईम रन, तसेच ५ किमी आणि १.६ किमी फन रन अशा पाच गटांमध्ये स्पर्धा होणार असून, टाईम रन विजेत्यांसाठी सुमारे तीन लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी १.६ किमी फन रन पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली असून, लहान वयापासून मुलांमध्ये व्यायाम, शिस्त आणि तंदुरुस्तीची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या स्पर्धेला ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनची मान्यता मिळणार असून, नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सहभागीला ड्राय-फिट टी-शर्ट, फिनिशर मेडल, हायड्रेशन सुविधा, अल्पोपहार आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. टाईम रनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना टायमिंग चिप आणि क्वालिफिकेशन सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. तसेच स्पर्धेतील सहभागींचे फोटो विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार असून, सुरक्षित आणि नियोजनबद्ध आयोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेचा मार्ग लवकरच जाहीर करण्यात येईल. इच्छुक धावपटूंनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून, ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील अनुभवी आणि नवोदित धावपटू, मुले, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आमदार रविंद्र चव्हाण यांनीही ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ हा केवळ धावण्याचा कार्यक्रम नसून शहरातील नागरिकांना एकत्र आणणारा उत्सव असल्याचे सांगत, फिटनेस आणि डोंबिवलीच्या सांस्कृतिक एकतेचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

