वृत्तसंस्था : आयपीएल २०२७ हंगामासाठी मुंबई इंडियन्सने महत्त्वाचा निर्णय घेत वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. शनिवारी फ्रँचायझीने याबाबत अधिकृत घोषणा केली. गेली १६ वर्षे पोलार्ड मुंबई इंडियन्सशी खेळाडू, मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडलेला असून आता त्याच्याकडे संपूर्ण संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वयाच्या २२व्या वर्षी मुंबई इंडियन्समध्ये दाखल झालेल्या पोलार्डने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर प्रशिक्षक म्हणूनही त्याने खेळाडूंना मार्गदर्शन केले. मुंबई इंडियन्सच्या सहमालक नीता अंबानी यांनी पोलार्ड हा संघाच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत त्याच्या अनुभव, नेतृत्वगुण आणि खेळावरील सखोल ज्ञानामुळे तो मुख्य प्रशिक्षक म्हणूनही संघाला नवे यश मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबई इंडियन्सची संस्कृती, खेळाडूंची मानसिकता आणि मोठ्या स्पर्धांतील दडपण याची पोलार्डला उत्तम जाण असल्याने त्याची नियुक्ती संघासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर कायरन पोलार्डनेही आनंद व्यक्त करत मुंबई इंडियन्स हा आपल्या आयुष्याचा आणि क्रिकेट कारकिर्दीचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून संघासोबत काम करताना मुंबई इंडियन्सच्या मूल्यांची आणि कामकाजाच्या पद्धतीची चांगली ओळख झाल्याचे तो म्हणाला. संघाचा यशस्वी वारसा पुढे नेणे, नवोदित खेळाडूंना घडवणे आणि चाहत्यांना आणखी संस्मरणीय क्षण देणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे पोलार्डने स्पष्ट केले. टी-२० क्रिकेटमधील बदलते तंत्र, आधुनिक रणनीती आणि स्पर्धेची वाढती तीव्रता याचा मोठा अनुभव त्याच्याकडे असल्याने संघाच्या भविष्यातील वाटचालीत त्याचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स युवा खेळाडूंना अधिक संधी देत संघातील एकजूट कायम ठेवण्यावर भर देणार असून, आयपीएल २०२७ मध्ये पुन्हा विजेतेपदासाठी जोरदार दावेदारी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत या नियुक्तीतून मिळत आहेत.

