कल्याण : शहरातील रिक्षा चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान महात्मा फुले पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. सागर राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत ही कारवाई केली. तपासात सागर राठोड हा नशेच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे समोर आले असून, व्यसनासाठी पैशांची गरज भागवण्यासाठी तो रिक्षा चोरी करत असल्याची कबुली त्याने दिली आहे. चोरी केलेल्या रिक्षांमधून तो लांब पल्ल्याची भाडी करत असे. चोरी उघड होण्याची शक्यता निर्माण होताच संबंधित रिक्षा वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देत तो पुन्हा दुसरी रिक्षा चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
आरोपीच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असून या कारवाईमुळे शहरातील रिक्षा चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलरामसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. आरोपीने यापूर्वी आणखी किती रिक्षा चोरल्या आहेत, तसेच या गुन्ह्यांमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

