मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्गावर वाहनचालकांना ‘म्युझिकल रोड’चा अनुभव देण्यासाठी संगीतपट्ट्यांची रचना करून ‘जय हो’ची सुरावट ऐकवण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला होता. मात्र रात्रंदिवस सुरू असलेल्या या आवाजामुळे त्रासलेल्या स्थानिकांच्या तक्रारींनंतर, रस्त्याचा हा भाग आठवड्यातील तीन दिवस काही वेळासाठी बंद ठेवण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत ही सुरावट वाजणार नाही.
मरिन ड्राइव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावर वाहनचालकांना ‘म्युझिकल रोड’चा अनुभव मिळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारीला या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. या मार्गावर नरिमन पॉइंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तरमार्गिकेवर हा प्रयोग साकारला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर, दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. यावरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास ‘जय हो’ या गीताची धून वाहनात बसलेल्यांना ऐकू येते. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात संगीतपट्टे बसविण्यात आले आहेत. वाहन ठराविक वेगात या पट्ट्यांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींवर ‘जय हो’ गाण्याची धून वाजते. भूमिगत बोगद्यात असतानाच चालकांना संगीतमार्गाची माहिती व्हावी, यासाठी महानगरपालिकेने ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटरआधीच याबाबत सूचनाफलक लावले आहेत. दिवसरात्र वाजणाऱ्या या संगीताने सागरी किनारा मार्गालगतच्या रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. या आवाजाची पातळी कंत्राटदारामार्फत मोजली असता, ती नियमानुसार असल्याचे निदर्शनास आले. तरीही स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे आठवड्यातील तीन दिवस ठराविक कालावधीत संगीत पट्टे असलेला रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत रस्ता बंद राहील. मुंबई सागरी किनारा मार्गावरील संगीत बंद राहावे, यासाठी रस्त्याचा हा भाग बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी बॅरिकेडिंग केले आहे.






