मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी धावणार आहे. विशेष म्हणजे मुंबई शहराची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेनला या पॉड टॅक्सीला जोडले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबईकरांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेनंतर्गत कुर्ला रेल्वे स्थानक थेट पॉड टॅक्सी स्थानकाशी जोडले जाणार आहे. कुर्ला स्टेशनला स्कायवॉकच्या माध्यमातून जोडण्याची ही योजना आहे. यामुळे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये काम करणाऱ्या मुंबईकरांना आपल्या कार्यालयात अतिशय सहज ये-जा करता येणार आहे.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, पॉड टॅक्सीचे हे स्टेशन कुर्ला स्टेशनबाहेर सध्याच्या पार्किंगच्या जागेवर उभारले जाऊ शकते. ही पार्किंगची जागा सुमारे १३७०.८० स्क्वेअर मीटर क्षेत्रात पसरलेली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने मध्य रेल्वेशी चर्चा केली आहे. मुंबई लोकलच्या काही स्थानकांना ज्याप्रमाणे मेट्रो स्टेशन्सशी स्कायवॉकने जोडले आहे, त्याच धर्तीवर कुर्ला स्थानकाला पॉड टॅक्सी स्टेशनशी जोडले जाणार आहे. पॉड टॅक्सीची ही कनेक्टिव्हिटी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये दररोज ये-जा करणाऱ्या सुमारे ६ लाख प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. सध्या कुर्ला स्टेशनवरून बीकेसीपर्यंत पोहोचणे हे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते. कारण, एकीकडे बस वेळेवर मिळत नाहीत, तर दुसरीकडे शेअर ऑटोवाल्यांची अनेकदा उपलब्धता नसते. त्यात वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड असते. पॉड टॅक्सीमुळे बीकेसीची कनेक्टिव्हिटी सुधारून या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.