नवी दिल्ली : नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६’च्या समारोप सोहळ्यात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या वतीने ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘नवीकरणीय ऊर्जा राज्य मूल्यांकन आराखड्या’अंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राने गुजरातनंतर देशात दुसरे स्थान पटकावले. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या मूल्यांकनात नवीकरणीय ऊर्जा क्षमता, धोरणात्मक व नियामक व्यवस्था, वीज ग्रिडची तयारी, वीज वितरण कंपन्यांची कामगिरी आणि गुंतवणुकीसाठीचे वातावरण या निकषांवर राज्यांचे मूल्यमापन करण्यात आले. २०३० पर्यंत देशाची जीवाश्म इंधनांव्यतिरिक्त वीजनिर्मिती क्षमता ५०० गिगावॅटपर्यंत नेण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मंत्रालयाने नमूद केले. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी ऊर्जा विभागासह सर्व संबंधित संस्थांचे अभिनंदन केले.
२ ते ५ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या परिषदेत महाराष्ट्र ‘पार्टनर स्टेट’ म्हणून सहभागी झाला होता. ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित राज्याच्या ऊर्जा दालनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या दालनात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा यांच्या सहकार्याने राज्यातील विविध हरित ऊर्जा प्रकल्प आणि उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. ‘व्हर्च्युअल रिॲलिटी झोन’मधून घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पाची आभासी सफर, तसेच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० आणि ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेची माहिती अभ्यागतांना देण्यात आली. संवादात्मक डिजिटल सादरीकरणे आणि सेल्फी बूथमुळे दालन आकर्षणाचे केंद्र ठरले. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील ही कामगिरी राज्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर सौर ऊर्जेसह विविध हरित ऊर्जा प्रकल्पांना अधिक गती देऊन महाराष्ट्राला स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला.

