पुणे : फास्ट फूड, जंक फूडच्या काळात पौष्टिक पर्याय शोधणाऱ्यांसाठी ‘स्विगी’ने नवी ‘लो कॅलरी फूड’ची श्रेणी आणली. त्यामुळे आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ‘हेल्दी’ आणि चविष्ट खाद्यपदार्थ मागवणे शक्य होणार असल्याचा दावा ‘स्विगी’ने केला आहे.
‘स्विगी’वर या श्रेणीत ५०० कॅलरीपेक्षा कमी असलेले तब्बल सव्वादोन लाख पदार्थ उपलब्ध आहेत. नाना प्रकारचे सूप्स, सॅलड्स, स्नॅक्स यांबरोबरच लो कॅलरी डेजर्ट्स, शेक्स असे गोड पदार्थ आणि भारतीय पद्धतीच्या जेवणाचाही यात समावेश असल्याचे ‘स्विगी’ने स्पष्ट केले आहे. ‘आजच्या ग्राहकांमध्ये आरोग्याविषयक जागरूकता वाढली आहे. ते केवळ चवदार पदार्थच नव्हे, तर भरपूर पोषणमूल्य असलेले आणि हलके खाणेदेखील शोधत आहेत. आमची ‘लो कॅलरी’ श्रेणी ग्राहकांच्या याच गरजेची पूर्तता करते,’ असा विश्वास ‘स्विगी’चे उपाध्यक्ष दीपक मळू यांनी व्यक्त केला. ‘‘लो कॅलरी’ श्रेणीत भरपूर प्रोटीन, फायबर्स आणि आवश्यक पोषणतत्त्वे आणि ५०० पेक्षा कमी कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.






