नागपूर (सतीश भालेराव) : नागपूर शहरात बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिमंडळ क्रमांक ४ अंतर्गत विशेष मोहिम राबवून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये परिमंडळातील सहा पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या एकूण १० गुन्ह्यांमध्ये तब्बल १८ अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. यात वाहन चोरी, घरफोडी, दुखापत, लैंगिक छळ आणि दंगल यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम पंच्याण्णव अंतर्गत संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून शिक्षा वाढवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कलमानुसार आरोपींना किमान ३ वर्षांची सक्त शिक्षा होऊ शकते, ज्यामुळे बालकांचा गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. तसेच, भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम एकशे छत्तीस (सी) अंतर्गत पालकांवरही जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून, प्रतिबंधात्मक कारवाई करून बालगुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिस प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळणार असून, बालगुन्हेगारीत घट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






