वृत्तसंस्था : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया कप २०२५ चा Asia Cup 2025 सुपर ४ सामना शुक्रवारी पार पडला. दुबई स्टेडियमवर पार पडलेला हा सामना अत्यंत रोमांचक झाला. यात भारताने प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेला विजयासाठी २०३ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंका २०२ धावा करू शकली आणि त्यामुळे सामना टाय झाला. टाय ब्रेकर म्हणून सुपर ओव्हर खेळवण्यात आली ज्यात प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेने भारताला ३ धावांचं आव्हान दिलं होतं. विजयाचं हे आव्हान टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच बॉलमध्ये जबरदस्त शॉट खेळून पूर्ण केलं. त्यामुळे टीम इंडियाचा आशिया कप २०२५ मध्ये अजेय राहण्याचा रेकॉर्ड कायम राहिला.
शुक्रवारी दुबईत पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाने श्रीलंका विरुद्ध ५ विकेट गमावून २०२ धावा केल्या. यात सर्वाधिक धावा या अभिषेक शर्मा (६१), तिलक वर्मा (४९), संजू सॅमसन (३९), अक्षर पटेल (२१) यांनी केल्या. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी २०३ धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकाकडून विजयाचं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना पथूम निसंकाने १०७ धावा करून दमदार अर्धशतक ठोकलं. तर कुशल परेरा (५८), दसून (२२) यांनी देखील चांगली खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने उभारलेला धावांचा डोंगर गाठण्यात त्यांना शक्य झालं. मात्र २० ओव्हरमध्ये २०२ धावा करता आल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. टाय ब्रेकर म्हणून खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचे फलंदाज प्रथम मैदानात आले. सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी अर्शदीप सिंहकडे देण्यात आली. यावेळी अर्शदीपने पहिल्याच बॉलवर कुशल परेराची विकेट घेतली. दुसऱ्या बॉलवर मेंडिस एक धाव घेण्यासाठी पळाला. अर्शदीपने टाकलेल्या दुसऱ्या बॉलवर एकही धाव आली नाही. चौथा बॉल वाईड होता, त्यामुळे श्रीलंकेला अजून एक धाव मिळाली. अर्शदीपने पुन्हा चौथा बॉल टाकला त्यावर एकही धाव घेणं श्रीलंकेच्या फलंदाजांना शक्य झालं नाही. पाचव्या बॉलवर शनाकाची विकेट गेली, त्यामुळे अखेर टीम इंडियाला सुपर ओव्हरच्या विजयासाठी ३ धावांची आवशक्यता होती. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे खेळाडू मैदानात फलंदाजीसाठी आले. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या पहिल्याच बॉलवर शॉट खेळून विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि सुपर ओव्हर जिंकली. टीम इंडियाचा आशिया कप २०२५ मधील हा सहावा विजय होता. आता २८ सप्टेंबर रोजी रविवारी होणाऱ्या आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. तेव्हा दोघांपैकी कोणता संघ आशिया कप चॅम्पियन ठरतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल.