नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला असून, सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. आता जर तुम्ही रेशन कार्डचा वापर करून धान्य उचलले नाही, तर तुमचे कार्ड कायमचे बंद होऊ शकते.
जुलै २०२५ मध्ये केंद्र सरकारने “लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश” अधिसूचित केला आहे. या नवीन नियमानुसार, ज्या कुटुंबांनी रेशन दुकानातून सलग ६ महिने धान्य घेतले नाही, त्यांचे रेशन कार्ड ‘इनअॅक्टिव्ह’ म्हणजेच निष्क्रिय केले जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन मिळणारे लाभार्थीही या कक्षेत येणार आहेत. केवळ रेशन मोफत आहे म्हणून ते उचलले नाही, तरीही तुमचे कार्ड रद्द होण्याची टांगती तलवार असेल. सध्या संपूर्ण देशात सुमारे २३ कोटी सक्रिय रेशन कार्ड आहेत. सरकारच्या या नव्या छाननी प्रक्रियेमुळे जवळपास ७ ते १८ टक्के रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बनावट, दुहेरी आणि अपात्र कार्डांची संख्या कमी करून खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचवणे, हा या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे. सर्व राज्यांना या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.






