पुणे : हुक्का पार्लरवर बंदीचे आदेश धुडकावून शहरात छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. स्वारगेट भागातील एका इमारतीत हॉटेलचा दरवाजा बाहेरून बंद करुन आत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीने कुलूप तोडले. हॉटेल मालक, व्यवस्थापक, तसेच कामगारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट भागातील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. हाॅटेलला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांच्या पथकाने खात्री केली. पोलिसांनी दरवाजा वाजविला. मात्र, हाॅटेलमधील कामगारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी हाॅटेलच्या दरवाज्याला बाहेरून लावलेली कुलूप तोडले. त्यानंतर पोलिसांनी आत प्रवेश केला. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा हाॅटेल मालकाच्या सांगण्यावरुन ग्राहकांना हुक्का पुरवित असल्याचे व्यवस्थापकाने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू, तसेच अन्य साहित्य असा २२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास भारमळ, उपनिरीक्षक सुजाता जाधव, पोलीस कर्मचारी टोणपे, कुडाळकर, ठोंबरे, जाधव, साळवे यांनी ही कारवाई केली.






