मुंबई : मुंबई शहरात वाहन बाहेर घेऊन जाताना पार्किंगची समस्या कायम असते. मात्र आता याचे टेन्शन राहणार नाही. मुंबई महापालिकेने पार्किंग पार्किंग ॲप्लीकेशन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आता त्यांच्या गाडीसाठी शहरात कुठेही पार्किंग घरबसल्या आरक्षित करता येणार आहे. पण या प्रकल्पाचा शुभारंभ कधी करण्यात येणार आहे त्याबाबतची एक अपडेट समोर आलेली आहे.
मुंबई शहरात अनेक भागात पार्किंग उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेकदा रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यात वाहतूक पोलिसांकडून अशा गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याने वाहन चालकांना भुर्दंड सहन करावा लागतो,त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन महापालिकेने स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून येत्या महिन्यातच त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सुरुवातीला या ५३० पार्किंग टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जाणार आहे. हे पार्किंग परिसर क्षेत्र खाजगी कंपनीला दिल्यावर त्यांनी अॅप्लीकेशनद्वारे वाहनांना पार्किंगची जागा मिळवून देणे बंधनकारक असणार आहे, असे पालिकेने सांगितले आहे. मुंबईत सुरु होणारे हे पार्किंग खाजगी भागीदारीतून चालवण्यात येणार असले तरी पार्किंग सुरु करताना त्यासाठी लागणारा दर हा मुंबई महानगरपालिका आणि खासगी संस्था एकत्रिरित्या ठरवणार आहे. मुंबईकरांची लुट होणार नाही याची विशेष खबरदारी ही घेण्याच येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.







