मुंबई : अंधेरी पोलिसांनी तब्बल १५० हून महागडी घड्याळे चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. अंधेरी परिसरातील मोबाईल शॉप फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या या सराईत आरोपींला अंधेरी पोलिसांनी बेड्या ठोकल्याआहेत. या कारवाईत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून विविध कंपन्यांची महागडी १५० घड्याळे, १० मोबाईल हँडसेट, कव्हर्स आणि ४४ हजार ६०० रुपयांची रोकड असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०७/०९/२५ रोजी मध्यरात्री सुमारास अंधेरी मेट्रो स्टेशनजवळील सुमित इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शॉपचे शटर उचकून चोरट्यांनी मोठी चोरी केली होती. या घटनेत सॅमसंग, ओप्पो, विवो, रिअलमी, डिजायर या कंपन्यांचे दहा मोबाईल फोन तसेच विविध कंपन्यांची महागडी घड्याळे आणि रोकड असा एकूण ३२ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात कलम ३०५,३३१(३) ३, (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ठाणे, कळवा परिसरात सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले.
मोईनुद्दीन नजीम शेख (वय ४६) साबीर मुस्तफा शेख (वय ४०) अमरउद्दीन अलीहसन शेख आणि प्रभू चौधरी (३०) अशी अटक आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी पूर्वीपासून गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी विविध कंपन्यांची महागडी १५० घड्याळे, १० मोबाईल हँडसेट, कव्हर्स आणि ४४ हजार ६०० रुपयांची रोकड असा एकूण ३२ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्रर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. विशेष पथकात पो.नि. विनोद पाटील, पो.नि. किशोर परकाळे, पो.उपनि. रमाकांत सुपे, तसेच पोलीस हवालदार पेडणेकर, कांबळे, शिंदे, पुजारी, कांबळी, पिसाळ व तसेच पोलीस शिपाई म्हात्रे,पाटील,लोंढे, गवळी, टर्की, तिघोटे, नरबट, मोरे यांचा समावेश होता. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून आरोपींना अटक करून मोठी चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे अंधेरी परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक पुन्हा प्रस्थापित झाला आहे.







