पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील पदपथ आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासोबतच फेरीवाल्यांना अधिकृत व्यवसायाची ओळख मिळावी यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सन २०२२ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले असून, त्यामुळे चार वर्षांपासून रखडलेली फेरीवाला क्षेत्र निर्मितीची प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पात्र फेरीवाल्यांना प्रमाणपत्रे व ओळखपत्रे वितरित करून नियोजित फेरीवाला क्षेत्रे निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील दहा प्रभागांमध्ये ही मोहीम सुरू केली आहे. ‘अ’ आणि ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सहायक आयुक्त अजिंक्य येळे आणि निवेदिता घार्गे यांच्या हस्ते पात्र फेरीवाल्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यापूर्वी २०१२, २०१४ आणि २०१६ मध्येही फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले होते, मात्र त्यानंतर फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. २०२२ च्या सर्वेक्षणात शहरात १९ हजार ७९२ फेरीवाले असल्याचे समोर आले होते. कागदपत्रांच्या छाननीनंतर १५ हजार १३ फेरीवाले पात्र ठरले, मात्र त्यांना प्रमाणपत्रे व ओळखपत्रे देण्याची प्रक्रिया रखडली होती.
दरम्यान, अनधिकृत टपऱ्या, पथाऱ्या आणि हातगाड्यांवर महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईविरोधात तसेच पथविक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, फेरीवाला क्षेत्र निश्चिती आणि पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्रे देण्याच्या मागणीसाठी फेरीवाला महासंघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर आता प्रमाणपत्र वितरणास गती मिळाली आहे. शहरातील दहा प्रभागांमध्ये फेरीवाला क्षेत्रासाठी सुमारे १०० जागा निश्चित करण्याचा प्रस्ताव असून, प्रत्येक प्रभागात दहा ठिकाणी अधिकृत फेरीवाला क्षेत्र विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने फेरीवाल्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. प्रमाणपत्र आणि ओळखपत्रामुळे नोंदणीकृत व्यवसायाला अधिकृत मान्यता मिळणार असून, भविष्यात कारवाईची भीती कमी होईल, असे त्यांनी नमूद केले. भूमी जिंदगी विभागाचे उपायुक्त सीताराम बहुरे यांनी मंगळवारपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्याचे नियोजन असून, फेरीवाला क्षेत्रासाठी जागा निश्चित करण्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली.

