वसई-विरार : वाढत्या नागरीकरणामुळे आणि प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अपुरी पडणाऱ्या वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेला अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसांपैकी पहिल्या टप्प्यातील ४० अत्याधुनिक पर्यावरणपूरक ई-बसेस दिवाळीपूर्वी महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना अधिक बसफेऱ्यांचा लाभ मिळणार असून गर्दीच्या प्रवासातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. वसई-विरार हे मुंबई आणि ठाण्यालगतचे वेगाने विकसित होणारे उपनगर असल्याने येथे रोज मोठ्या संख्येने नोकरदार आणि विद्यार्थी प्रवास करतात. सध्या महापालिकेकडे १२० बसेस असल्या तरी त्यापैकी केवळ ४० ई-बसेस प्रत्यक्ष सेवेत असून, ३६ मार्गांवरून दररोज ६५ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत बसेसची संख्या अपुरी असल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवासारख्या सणांदरम्यान कर्मचाऱ्यांचे आंदोलन, नादुरुस्त बसेस आणि खराब रस्त्यांमुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे नवीन बसांची मागणी सातत्याने होत होती.
दरम्यान, केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या जेबीएम या पुरवठादार कंपनीसोबतच्या करारातील तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे एप्रिलमध्ये अपेक्षित असलेल्या या बसेसचे आगमन रखडले होते. मात्र आता सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याने पहिल्या टप्प्यातील ४० ई-बसेस सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या बसेसच्या मदतीने प्रवासी भार असलेल्या मार्गांवर फेऱ्या वाढविणे तसेच आतापर्यंत बससेवेपासून वंचित असलेल्या अंतर्गत भागांत नवीन मार्ग सुरू करणे शक्य होणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी दिली. या बसांच्या चार्जिंग, पार्किंग आणि देखभालीसाठी नवघर (वसई) आणि नालासोपारा येथे अत्याधुनिक ई-बस आगार उभारले जात असून, या प्रकल्पासाठी शासनाकडून २७.१७ कोटी आणि महापालिकेकडून १० कोटी, असा एकूण ३७.१७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. या आगारांचे काम सुमारे ९० ते ९५ टक्के पूर्ण झाले असून, तोपर्यंत नव्या बसेस विरार महापालिका मुख्यालयालगतच्या तात्पुरत्या आगारातून चालविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे वसई-विरारची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनण्यास मोठी मदत होणार आहे.

