वृत्तसंस्था : मोबाईल वापरकर्त्यांसाठी वोडाफोन आयडिया (Vi) ने मोठी दिलासादायक योजना जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी देशातील पहिली ‘रिचार्ज-लिंक्ड हँडसेट थेफ्ट अँड लॉस इन्शुरन्स’ सुविधा सुरू केली असून, निवडक डेटा ॲड-ऑन रिचार्ज पॅकवर मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास ₹२५ हजारांपर्यंतचा विमा संरक्षण मिळणार आहे. वाढत्या स्मार्टफोन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा ₹६१, ₹२०१ आणि ₹२५१ या तीन विशेष डेटा प्लॅन्सवर उपलब्ध असून, या रिचार्जसोबत डेटा लाभांसह विमा कव्हरही दिले जाणार आहे. ₹६१ च्या प्लॅनमध्ये १५ दिवसांसाठी २ जीबी डेटा आणि ३० दिवसांचा विमा, ₹२०१ च्या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी १० जीबी डेटा आणि १८० दिवसांचा विमा, तर ₹२५१ च्या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी १० जीबी डेटा आणि तब्बल ३६५ दिवसांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ अँड्रॉइड तसेच आयफोन वापरकर्त्यांनाही समानपणे मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, पारंपरिक मोबाईल विमा योजनांमध्ये प्रामुख्याने फोनच्या भौतिक नुकसानीचे संरक्षण मिळते, मात्र Vi च्या या नव्या योजनेत फोन चोरीला जाणे किंवा पूर्णपणे हरवणे अशा परिस्थितीतही ग्राहकाला ₹२५ हजारांपर्यंतचा विमा दावा करता येणार आहे. क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असून, ग्राहकांच्या आधीपासून उपलब्ध असलेल्या KYC माहितीच्या आधारे ती जलद आणि सुलभ पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. याचबरोबर कंपनीने ‘Vi प्रीपेड फॅमिली प्लॅन’चीही घोषणा केली आहे. या सुविधेमुळे कुटुंबातील सदस्य देशात कुठेही राहत असले तरी एकमेकांमध्ये डेटा शेअर करू शकतील. एखाद्या सदस्याचा डेटा संपल्यास दुसरा सदस्य एका वेळी ५०० एमबीपर्यंत डेटा सहज शेअर करू शकणार आहे. या नव्या सुविधा ग्राहकांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर मोबाईल सेवा अनुभव देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानल्या जात आहेत.

