भारतीय इतिहासात अनेक सम्राट, राजे, पराक्रमी सेनानी आणि साम्राज्यविस्तार करणारे योद्धे झाले, पण त्यांच्यापैकी काही जण केवळ सत्ता व विस्तारासाठी ओळखले जातात तर काहींनी मानवतेला दिशा दिली, तत्त्वज्ञानाची नवी वाट दाखवली आणि जनमानसाला शाश्वत मूल्यांची जाणीव करून दिली. सम्राट अशोक हा त्यातला सर्वात मोठा आणि अजरामर असा नायक ठरतो. अशोकाच्या आयुष्यातील दोन घटना विशेष महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये पहिली म्हणजे कलिंगयुद्धानंतर झालेला त्याचा आत्मबोध आणि दुसरी म्हणजे बुद्धाच्या करुणामय धम्माची अंगीकारलेली वाट होय. या दोन घटनांनी त्याला केवळ सम्राट न ठेवता ‘धम्मराजा’ बनवले. आजच्या काळात, जेव्हा मानवतेसमोर हिंसा, द्वेष, युद्ध, पर्यावरणाचा ऱ्हास आणि विषमता यांची मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत, तेव्हा अशोकाचा धम्ममार्ग व बुद्धतत्त्वज्ञान हे पुन्हा एकदा प्रकाशमार्ग ठरतात. विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांचा एकत्रित संदर्भ घेतल्यास, अशोकाचा जीवनप्रवास आपल्याला अधिक सखोलतेने समजतो.
विजयादशमीच्याच दिवशी बुद्धतत्त्वज्ञानाच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना म्हणजे नागपूर येथे १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तन केले. म्हणूनच विजयादशमीचा दिवस हा सामाजिक समतेचा, मानवी मुक्तीचा व नवा इतिहास घडवणारा क्षण मानला जातो. अशा या दिवशी सम्राट अशोकाचे जीवन आणि त्याचे धम्मतत्त्वज्ञान यांचा विचार करणे म्हणजे आपल्याला बौद्ध विचारसरणीच्या मूळ तत्त्वांचे आकलन करून घेणे होय. कलिंगयुद्ध हे अशोकाच्या आयुष्यातील निर्णायक पान ठरले. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात झालेल्या या युद्धात लाखो लोकांचा बळी गेला, हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. इतिहास सांगतो की, युद्धानंतर रणांगणावर पडलेल्या मृतदेहांचे दृश्य पाहून अशोकाच्या हृदयात प्रचंड वेदना निर्माण झाली. विजय मिळवूनही मनाने तो पराभूत झाला. मानवी रक्तपात, हिंसा आणि मृत्यूचे दाहक चित्र त्याच्या चेतनेला हलवून गेले. त्या क्षणी त्याला जाणवले की, खऱ्या विजयाचा मार्ग हा शस्त्रांनी नव्हे तर धम्माने, करुणेने व अहिंसेने साधला जातो. आणि तेव्हापासून त्याच्या जीवनाची दिशा बदलली. सम्राट अशोक बुद्धाच्या धम्ममार्गाचा अनुयायी झाला. बुद्धतत्त्वज्ञान हे केवळ धार्मिक आस्था नसून ते मानवी जीवनाला व्यवस्थित घडवणारे, सामाजिक न्याय देणारे आणि सार्वत्रिक बंधुता निर्माण करणारे तत्त्वज्ञान आहे. बुद्धाने शिकवलेली चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्ग यांमध्ये जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी तत्त्वे दडलेली आहेत. दुःख हे जीवनाचे सत्य आहे, दुःखाची कारणे तृष्णेत आहेत आणि त्या तृष्णेवर मात केली तर निर्वाणाचा मार्ग खुला होतो, ही शिकवण ही फक्त आध्यात्मिक विचारधारा नव्हे तर जीवनाला शांती आणि स्थैर्य देणारी दिशा आहे. अशोकाने बुद्धाची ही शिकवण केवळ वैयक्तिक स्तरावर स्वीकारली नाही, तर आपल्या संपूर्ण राज्यकारभारात त्याची अंमलबजावणी केली.
अशोकाच्या धम्मराज्याची कल्पना ही भारतीय इतिहासातील अनोखी देणगी आहे. ‘धम्म’ म्हणजे केवळ धार्मिक आचार नाही, तर तो जीवनशैली आहे. धम्मामध्ये करुणा, दया, अहिंसा, समता, सत्य, संयम, आणि सर्व प्राणिमात्रांबद्दल आदर या मूल्यांचा समावेश आहे. अशोकाने आपल्या शिलालेखांमधून या धम्मतत्त्वांचा प्रसार केला. “सर्व प्राणी माझी मुले आहेत” हे त्याचे वचन हे मानवतेच्या सार्वत्रिक भावनेचे प्रतीक आहे. युद्ध आणि रक्तपाताने नव्हे तर धम्ममार्गाने जगाला जिंकता येते, हा विचार त्याने दिला. विजयादशमीच्या संदर्भात अशोकाचे महत्त्व असे ठरते की, येथे विजय हा शस्त्रांचा नसून आत्मबोधाचा आहे. अहंकारावर, हिंसेवर, क्रौर्यावर अशोकाने विजय मिळवला असून त्याचा हा विजय अधिक व्यापक ठरला. कारण त्यातून एक संपूर्ण तत्त्वज्ञान मानवतेसमोर आले. बुद्धाचे धम्मचक्र त्याने आपल्या साम्राज्यात आणि त्याही पुढे दूरवर फिरवले. भारताबाहेर श्रीलंका, बर्मा, चीन, तिबेट, थायलंड, जपान अशा अनेक देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला. हा प्रसार शस्त्रांनी नव्हे तर करुणेच्या संदेशाने झाला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा संदर्भ घेतल्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीदिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बाबासाहेबांच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा शोषणमुक्त, समतामूलक आणि आधुनिक विचारांचा आधार होता. त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय या सर्वांना संपवण्यासाठी धम्माचा स्वीकार केला. हा निर्णय ही फक्त धार्मिक परंपरेची परतफेड नव्हती, तर ती सामाजिक क्रांती होती. त्यामुळे विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हे एकमेकांना पूरक आहेत. सम्राट अशोकाने धम्ममार्गाने साम्राज्याला नवी दिशा दिली तर बाबासाहेबांनी धम्ममार्गाने भारतीय समाजाला नवा जन्म दिला.
आजच्या काळात या दोन प्रेरणादायी घटनांची गरज अधिक भासत आहे. जगभरात युद्धाची, दहशतीची, द्वेषाची छाया पसरली आहे. आधुनिक विज्ञानाने माणसाला भौतिक सुखसुविधा दिल्या आहेत, पण त्याच वेळी शस्त्रास्त्रांची शर्यत, पर्यावरणाचा ऱ्हास, नैतिक मूल्यांचा ऱ्हास यामुळे मानवी जीवन असुरक्षित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला धम्ममार्ग मानवतेला नवी दिशा देऊ शकतो. अहिंसा, करुणा, दया, समता, बंधुता ही तत्त्वे जर आचरणात आली तरच खऱ्या अर्थाने मानवतेचा विजय होईल. सम्राट अशोकाच्या धम्मनीतीमध्ये राजकारण आणि धर्म यांचा विलक्षण संगम दिसतो. राजकारणात सत्ता व विस्तार हे प्रधान मानले जातात, पण अशोकाने धम्माला राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवले. त्याने आपल्या प्रजेला सत्य, करुणा, दया, अहिंसा या तत्त्वांवर चालण्याचे आवाहन केले. त्याचे शिलालेख हे जगाला मार्गदर्शन करणारे ऐतिहासिक दस्तावेज ठरले. एखाद्या शासकाने युद्धानंतर हिंसेचा मार्ग सोडून मानवतेच्या मार्गाचा स्वीकार करणे ही अभूतपूर्व घटना होती. त्यामध्ये खरी मानवी क्रांती दडलेली होती.
धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्याला सांगतो की, खरी क्रांती ही बाह्य स्वरूपात नसून ती अंतःकरणातील बदलात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उपेक्षित घटकांना मानवी प्रतिष्ठा दिली, समतेचा मार्ग दाखवला. हे कार्य बुद्ध व अशोक यांच्या परंपरेतलेच होते. कारण बुद्धाने सांगितले होते की, “सर्व प्राणी समान आहेत, जातीपातीच्या बंधनात कोणी नाही.” ही शिकवण सम्राट अशोकाने आचरणात आणली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक काळात सामाजिक पातळीवर सिद्ध केली. सम्राट अशोकाचा विजय हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो मानवतेचा विजय होता. त्याने दाखवून दिले की, युद्धाने राज्य जिंकता येतात पण धम्माने मनं जिंकता येतात. विजयादशमीच्या दिवशी आपण हे स्मरण करायला हवे की खरा विजय हा अंतर्मनातील आहे. लोभ, क्रोध, मत्सर, हिंसा यांवर नियंत्रण ठेवणे आणि करुणा, दया, बंधुता या मूल्यांचा स्वीकार करणे हाच विजय आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, सामाजिक न्याय आणि समता हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया आहे. बौद्ध धम्मातील त्रिशरण, बुद्ध, धम्म व संघ ही तिहेरी शरणागती आपल्याला सामूहिक जीवनासाठी आवश्यक मूल्ये शिकवते. बुद्ध म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ, धम्म म्हणजे जीवनमार्ग, आणि संघ म्हणजे सामूहिक एकता. या तत्त्वांच्या आधारावरच समाजात शांती आणि प्रगती साधता येईल.
आजच्या पिढीसमोर डिजिटल युग, तांत्रिक प्रगती आणि वेगवान बदलांच्या लाटेमध्ये मानसिक अस्थैर्य, ताणतणाव, एकाकीपणा यांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बौद्ध धम्माची ध्यानपरंपरा, करुणेचा संदेश आणि मध्यमार्गाची शिकवण अधिकच महत्त्वाची ठरते. सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्ममार्ग म्हणजे आधुनिक युगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी संतुलन आणि शांतीचे साधन आहे. अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हे एकत्रितपणे भारतीय इतिहासातील मानवी मूल्यांचे स्मारक आहेत. हे दिवस आपल्याला सांगतात की, खरा विजय हा करुणेत, समतेत आणि अहिंसेत आहे. युद्धे, हिंसा, सत्ता यांचा अंत होत राहतो, पण धम्ममार्ग शाश्वत राहतो. म्हणूनच या दोन्ही घटनांची प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनात धम्मतत्त्वांचा अवलंब केला तरच मानवतेला नवा सुवर्णकाळ देता येईल.
डॉ. राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)
मो. क्र. ९९६०१०३५८२, ईमेल – bagate.rajendra5@gmail.com