मुंबई : तब्बल ११२ वर्षे जुन्या शीव रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्याने बेस्ट उपक्रमाने शीव, धारावी आणि परिसरातून धावणाऱ्या १४ बससेवांचे मूळ मार्ग पुन्हा सुरू केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पर्यायी मार्गांमुळे प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. पुनर्बांधणीसाठी ३० जून २०२४ पासून पूल बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेक बसमार्ग वळविण्यात आले होते. आता पूल पुन्हा सुरू झाल्याने शीवच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील संपर्क पूर्ववत झाला असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
मूळ मार्गावर परतलेल्या बससेवांमध्ये १८१, २५५ लिमिटेड, ३४८ लिमिटेड, ए-३१२, ३४१, ए-३७५, एसी-५०५, ए-३७६, ए-७, ए-२२, २९ लिमिटेड, ४११, ११ लिमिटेड आणि सी-३०५ या मार्गांचा समावेश आहे. या बस आता राणी लक्ष्मीबाई चौक, संत रोहिदास मार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या प्रमुख रस्त्यांवरून पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. १८१, २५५ लिमिटेड आणि ३४८ लिमिटेड या सेवा पुन्हा संत रोहिदास मार्ग, पिवळा बंगला आणि तापसे चौकमार्गे कलानगरकडे जातील. तर ए-३१२ आणि ३४१ हे मार्ग रस्ता क्रमांक ८ मार्गे लाल बहादूर शास्त्री मार्गावरून धावतील. याशिवाय लोकमान्य टिळक रुग्णालयाजवळून धावणाऱ्या बससेवाही पूर्ववत करण्यात आल्या आहेत. ए-७, ए-२२, २९ लिमिटेड आणि ४११ या बस स्वामी श्री वल्लभदास मार्ग आणि संत रोहिदास मार्गावरून पूर्वीच्या मार्गाने धावतील. ११ लिमिटेड ही सेवा वसंतराव नाईक मार्ग आणि राणी लक्ष्मीबाई चौकामार्गे सुरू करण्यात आली आहे. तसेच एसी-५०५ आणि ए-३७६ या बसही शीव आणि धारावीमार्गे त्यांच्या नियमित मार्गावर पुन्हा धावू लागल्या आहेत. पुलाच्या पुनर्बांधणीनंतर बससेवा पूर्ववत झाल्याने शीव, धारावी आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

