मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि कलांचा वारसा वर्षभर जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने ‘bappa.org’च्या पुढाकारातून ‘बाप्पाचा कट्टा’ हा ९० दिवसांचा सांस्कृतिक उपक्रम सुरू होत आहे. २९ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबई आणि पुण्यात या उपक्रमाची सुरुवात होणार असून, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि श्रीपाद आष्टेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पनेला पुढे नेत या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडा, म्हणी, अंताक्षरी, लोककला तसेच पारंपरिक आणि आधुनिक कलांचा संगम या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे.
मुंबईतील वांद्रे बँडस्टँड आणि पुण्यातील एफ.सी. रोड येथे हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, १५ नोव्हेंबर २०२६ ते २४ जानेवारी २०२७ दरम्यान प्रत्येक रविवारी सायंकाळी कार्यक्रम होणार आहेत. कुटुंबीय, मित्र, सहकारी, विद्यार्थी-शिक्षक अशा जोड्यांना तीन मिनिटांत आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून इच्छुकांनी +९१ ९१३६१ ७२६८१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ३० सेकंदांचा ऑडिशन व्हिडिओ पाठवायचा आहे. प्रत्येक शहरातून दर आठवड्याला १६ जोड्यांची निवड केली जाईल आणि सार्वजनिक व्हॉट्सॲप मतदानाद्वारे विजेते ठरवले जातील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ₹५,०००, ₹३,००० आणि ₹२,००० रोख पारितोषिकांसह सुवर्ण, रौप्य आणि कांस्य ‘मोदक करंडक’ प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमातील प्रत्येक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर करण्यात येणार असून, दर आठवड्याला सेलिब्रिटी सह-यजमान कलाकारांना प्रोत्साहन देणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत सायंकाळी ७ वाजता आणि पुण्यात सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तसेच २६ जानेवारी २०२७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे भव्य महाअंतिम सोहळा होईल. यावेळी ‘कलाधिपती करंडक’ प्रदान करण्यात येणार असून, ‘६४ कलांचा मोदक’ हा विशेष सांस्कृतिक आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्राची लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना या वारशाच्या जतनात सहभागी करून घेणे, हा ‘बाप्पाचा कट्टा’ उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

