नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाला काय नाव द्यायचे अखेर ठरले आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील विमानतळ असे नाव देण्याची मागणी केली जात होती. अखेर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाआधी सरकाने नावाचा प्रश्न सोडवला आहे. नवी मुंबई विमानतळासंदर्भात दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारकडून एकच नाव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, काही तांत्रिक कारण असल्याने काहीसा वेळ लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तीन महिन्यात दि बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सरकार कडून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याच्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार केला आहे. यामुळे विमानतळ नामकरणाच्या संदर्भात सर्वपक्षीयांकडून काढण्यात येणारा मोर्चा तात्पुरता स्थगित केल्याची माहिती देण्यात आली.
नवी मुंबई विमानतळावरून आता विनाअडथळा उड्डाणे होऊ शकणार आहेत. या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून ‘एरोड्रोम लायसन्स’ जारी करण्यात आले आहे. विमानतळाचे नियमित उड्डाण सुरू करण्यासाठी हा परवाना अत्यावश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ८ आणि ९ ऑक्टोबर असा मोदींचा दोन दिवसांचा मुंबई दौरा असणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो-३ आणि इतर काही विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. तर, ९ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२५ ला उपस्थित राहणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर हे देखील ग्लोबल फिनटेक फेस्टला उपस्थित असतील.. बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल आयोजीत करण्यात आलाय. या दौ-यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात मुक्कामी असतील. दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरात बेकायदेशीर कत्तलखान्यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. हवाई सुरक्षेला होणारा धोका रोखण्यासाठी DGCA ने कठोर पावले उचलली आहेत. प्राण्यांच्या बेकायदा कत्तली, मृतदेहांची निष्काळजीपणे केलेली विल्हेवाट आणि कचरा टाकणे यावर DGCA ने कठोर पावले उचलली आहेत.