मुंबई : शहरात भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची तीव्रता वाढवत वसई परिसरात मोठी धडक मोहीम राबवली. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्र. १ आणि अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई यांच्या संयुक्त पथकाने वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दूध भेसळ करणाऱ्या चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान एकूण आठ अन्न नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. याशिवाय, सुमारे ६२१ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले असून ते सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने तत्काळ नष्ट करण्यात आले. जप्त केलेल्या दुधाची किंमत अंदाजे ३६ हजार २११ रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईमुळे दुधाच्या भेसळीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या वाहनांची व्यापक तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. शहराच्या सीमेवरील टोल नाक्यांवर रात्री विशेष पथके तैनात करून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान काही संशयास्पद नमुने आढळल्यानंतर प्रशासनाने शहरातील विविध भागांत छापेमारी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलुंड (आनंद नगर), एलबीएस मार्ग, ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी या सहा ठिकाणी रात्रभर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ११,०८०.५ लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला. त्यापैकी निकृष्ट दर्जाचे दूध सील करून उत्पादकांकडे परत पाठवण्यात आले, तर ९० लिटर असुरक्षित दूध तात्काळ नष्ट करण्यात आले. एकूण १९५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी १८८ नमुने प्रमाणित, ६ नमुने निकृष्ट आणि १ नमुना असुरक्षित आढळून आला. ही संपूर्ण मोहीम अन्नसुरक्षा अधिकारी ऋतुजा जाधव, रामू माळी, श्रीपाद धरगुटे, प्रतीक्षा मसुगडे तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न) डॉ. भूपण मोरे यांच्या पथकाने पार पाडली. सहआयुक्त (अन्न) म.ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील काळातही भेसळविरोधी मोहिमा अधिक कडक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







