नवी दिल्ली : भारत सरकारने ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यानंतर पैशांच्या आधारावर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घातली. याचा थेट परिणाम फॅन्टसी गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी ड्रीम11 वर झाला असून, कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले आहे की ते आता भारतीय संघाचे स्पॉन्सर राहू शकणार नाही. दुबईत सुरू होणाऱ्या आशिया कपच्या फक्त दोन आठवडे आधी टीम इंडियाला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. ड्रीम11च्या माघारीमुळे बोर्डाला तब्बल ११९ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ड्रीम11च्या प्रतिनिधींनी बीसीसीआय कार्यालयाला भेट दिली आणि सीईओ हेमांग अमीन यांना पुढे स्पॉन्सरशिप सुरू ठेवता येणार नसल्याची माहिती दिली. परिणामी, ते आशिया कपसाठी टीमचे स्पॉन्सर राहणार नाहीत. बीसीसीआय लवकरच नवीन टेंडर जारी करेल.” बीसीसीआयच्या दुसऱ्या अधिकाऱ्याच्या मते, ड्रीम11वर कोणताही दंड आकारला जाणार नाही. करारामध्येच एक तरतूद आहे की, जर स्पॉन्सरशिपचा मुख्य व्यवसाय सरकारच्या कायद्यामुळे प्रभावित झाला, तर त्यांना बीसीसीआयला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. ड्रीम11ची स्थापना सुमारे १८ वर्षांपूर्वी झाली. ब्लूमबर्गच्या मते, ही कंपनी सध्या तब्बल ८ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह भारतातील सर्वात मोठा फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. जुलै २०२३ मध्ये ड्रीम11ने बीसीसीआयसोबत ३ वर्षांसाठी ३५८ कोटी रुपयांचा करार केला होता. याआधी हा अधिकार एडटेक कंपनी बायजूजकडे होता.