वृत्तसंस्था : देशात प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या फार गंभीर आहे. देशातील प्रसिद्ध देवस्थानात जगभरातून भाविक येतात. अशावेळी तर प्लास्टिकचा कचरा जास्त होतो. पण असंही एक देवस्थान आहे, जिथे तुम्ही कचरा पेटीत टाकताच थेट तुमच्याच अकाऊंटमध्ये पैसे येतील. आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने पवित्र स्थळाची स्वच्छता वाढवण्यासाठी डिजिटल डिपॉझिट रिफंड स्कीम (DDRS) सुरू केली आहे. हैदराबाद-आधारित कंपनीने विकसित केलेल्या ‘रेकलेइम एसी’ सारख्या AI-संचालित मशिन्स मंदिर परिसरात बसवल्या आहेत. या योजनेमुळे भक्त रिकामे टेट्रा पॅक किंवा अॅल्युमिनियम कॅन मशिनमध्ये टाकून UPI द्वारे त्वरित रक्कम परत मिळवू शकतात. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या तंत्रज्ञानाचा आढावा घेतला असून, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जागरूकतेसाठी प्रत्येक कचऱ्यावर ५ रुपये बक्षीस मिळते.
मंदिरात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर खास QR कोड असतो. खरेदीवेळी किंमतेचा भाग डिपॉझिट खात्यात जमा होतो. वापरानंतर रिकामा कचरा मशिनमध्ये स्कॅन करून टाकला की, AI तपासणी करून UPIद्वारे रक्कम लगेच परत येते. ही प्रक्रिया कचऱ्याचे ब्रँड, आकार व घाण याची ओळख करून घेते, ज्यामुळे कचरा कुंडीत न पडता थेट पुनर्वापर होतो. याने मंदिराची परिसर स्वच्छ राहतो आणि कचरा व्यवस्थापनही पारदर्शक होते, असे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या भारतीय मशिन्समध्ये ५०% स्थानिक सामग्री वापरली असून, AI व IoT तंत्रज्ञानाने उष्णता, आर्द्रता व धूळला तोंड देण्याची क्षमता आहे. मशिन कचऱ्याचा रंग, आकार व ब्रँड स्कॅन करून वैधता तपासते, ज्यामुळे फसवणूक रोखली जाते. भारताच्या AI प्रगतीचा भाग म्हणून ही मशिन पर्यावरणीय नुकसान कमी करून पुनर्वापर सुलभ करते, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली. स्वच्छता कर्मचारीही गोळा केलेला कचरा मशिनमध्ये टाकून तात्काळ उत्पन्न वाढवू शकतात, ज्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. भक्तांना प्रोत्साहन मिळून मंदिराची पवित्रता राखली जाते. ही योजना कचरा कमी करून पर्यावरण संतुलन साधत असल्याची प्रतिक्रिया भक्तांनी दिलीय.