विरार : वसई विरार महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच गाजू लागला आहे. निवडणूक काळात विविध भागात छुप्या मार्गाने मद्य निर्मिती व विक्री केली जात आहे. यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत ७५ गुन्हे दाखल करीत ७६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख रुपये किंमतीचे मद्य जप्त केले आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता लागू होताच प्रशासनाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात सीमालगतच्या भागातून व बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक केली जाते. तर काही भागातील जंगलात गावठी दारूची निर्मिती केली जात असते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या मार्फत विशेष मोहीम सुरु करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीची घोषणा होताच प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो. यासाठी विविध भागातून बेकायदेशीररित्या मद्याची विक्री व वाहतूक केली जात असते. यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथके नियुक्त करून कारवाई सुरू केली आहे. बाहेच्या राज्यातून येणारी मद्य, गावठी मद्य, त्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, वाहने यावर जप्ती आणून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत ७५ गुन्हे दाखल करून ७६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २४ लाख ६१ हजार ५५० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. यात १४४५ लीटर गावठी दारू, देशी मद्य १९० लीटर, बिअर, राज्यातील विदेशी मद्य ३५ लीटर, परराज्यातील विदेशी मद्य ३ लीटर, ताडी ६०५ लीटर, रसायन ३३९५० लीटर यांचा समावेश आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी सांगितले आहे.






