मुंबई : वांद्रे बँड स्टँड येथे एक तरुणी समुद्रात बुडून तिचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, पाच अल्पवयीन मुले मालाड पश्चिमेकडील मार्वे समुद्रात बुडाली. ही घटना घडली. यापैकी दोन मुलांना समुद्र किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांनी वाचवले. तर तीन मुले अद्यापही बेपत्ता असून नौदल, तटरक्षक दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबई शहर व उपनगरात पावसाची उघडीप सुरू आहे. सकाळच्या वेळी समुद्राला भरतीही होती. त्यातच मालाड मार्वे परिसरातील १२ ते १६ वयोगटातील पाच अल्पवयीन मुले मार्वे समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल खेळत होती. फूटबॉल खेळत असताना, त्यांचा बॉल पाण्यात गेला. तो आणण्यासाठी एक मुलगा समुद्रात गेला. मात्र, फूटबॉल तरंगत आत जात असल्याने या मुलाला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. हे पाहताच उर्वरित चार जणांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, साधारण अर्धा किलोमीटरवर ही पाचही मुले बुडत असल्याचे किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांना दिसले. त्यानंतर स्थानिकांनी पाचही मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यापैका कृष्णा हरीजन (वय १६) आणि अंकुश शिवरे (१३) या दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, शुभम जैस्वाल (१२), निखिल कायामकुर (१३) आणि अजय हरीजन (१२) हे तिघेही बेपत्ता असून, तटरक्षक दल आणि नौदलाकडून त्यांचा शोध सुरू आहे.
– १३ जून – जुहू समुद्रात १२ ते १६ वयोगटातील पाच अल्पवयीन मुले पोहायला गेली होती. यापैकी चार जणांचा मृत्यू
– १८ जून – मालाडच्या अक्सा किनाऱ्यावर पोहोयला गेलेल्या १९ जणांना जीवरक्षकांनी वाचवले
– १० जुलै – कुटुंबीयांसोबत वांद्रे पश्चिम येथील बँड स्टँड येथे गेलेली २७ वर्षीय तरुणी फोटो काढताना दगडावरून पाय घसरून पडल्याने, समुद्रात बुडून तिचा मृत्यू झाला.





