मुंबई : राज्यातील विविध सामाजिक संस्थांना आज ४१४ अंगणवाड्या दत्तक देण्यात आल्या आहेत. यासंबंधीची घोषणा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केली. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी लोढा ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील ५५,७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती लोढा यांनी दिली.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन,एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, विपला फाऊंडेशन,ग्रामसेवा प्रतिष्ठान,स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट, कार्बेट फाऊंडेशन यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे.सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ४ आक्टोबर २०२२ रोजी अंगणवाडी दत्तक धोरणासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या होत्या. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती,कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. शासन अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी अनेक योजना शासन राबवत असल्याचे ते म्हणाले.
अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत दि.४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध १५६ सामाजिक संस्थानी आतापर्यंत ४८६१ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत. आज विपला फाऊंडेशनने पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ३६८, ग्रामसेवा प्रतिष्ठानने रायगड आणि ठाणे मधील ३०, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई उपनगर आणि नाशिक मधील १०, कार्बेट फाऊंडेशनने सिंधुदुर्ग आणि पुणे मधील १६ अंगणवाड्या क्षमता वृध्दीसाठी दत्तक घेतल्याची माहिती लोढा यांनी दिली.





