मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त मुंबईत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने साहित्य अकादमी (राष्ट्रीय साहित्य संस्थान), संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि देशभक्तीचे प्रतीक मानले जाते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या गीताने देशवासीयांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या ऐतिहासिक गीताच्या १५० वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करत त्याचा साहित्यिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. या सांस्कृतिक सोहळ्यात साहित्य, संगीत आणि भारतीय संस्कृतीचा संगम अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार असून, ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक योगदानावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त साहित्य संस्था असून, भारतीय भाषांचे संवर्धन, साहित्याचा प्रचार-प्रसार आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्य आणि संस्कृती यांच्यातील दृढ नाते अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा विशेष सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा, राष्ट्रप्रेरणेशी निगडित साहित्य आणि कलाकृतींचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असला, तरी काही आसने राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील साहित्यप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.







