पुणे : पुण्यात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू असून, येत्या २५ सप्टेंबर रोजी गणरायाला निरोप देण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. तब्बल १० हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच बाहेरून मागविण्यात आलेले अतिरिक्त पोलीस दल विसर्जन मिरवणुकीदरम्यान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या दहा दिवसांपासून शहरात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडत असून, आता पुढील तीन दिवस कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या प्रमुख मार्गांवरून तब्बल ६३८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अलका टॉकीज चौकाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुमारे ४,५०० समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता टिळक चौक येथे मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची आरती झाल्यानंतर पारंपरिक विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण मिरवणुकीवर AI कॅमेरे, ड्रोन, CCTV नेटवर्क, मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘नॉईज लेव्हल मॉनिटरिंग’ प्रणालीद्वारे सतत नजर ठेवली जाणार आहे. प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाला जास्तीत जास्त दोन ढोल-ताशा पथके ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून, कोणत्याही चौकात १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ वादन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी शहरात २६ अधिकृत पार्किंग झोनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, गेल्या दोन किंवा त्याहून अधिक वर्षांपासून पारंपरिक मार्गांवरून विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनाच यंदा मुख्य मार्गावर परवानगी देण्यात आली आहे. शहराच्या इतर भागातील नव्या मंडळांना मुख्य विसर्जन मार्गावर येण्यास परवानगी नाकारण्यात आली असून, वाढती गर्दी नियंत्रित ठेवणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.





