मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मुंबईकरांसाठी महत्त्वाची डिजिटल सुविधा सुरू केली आहे. यंदा गणेश विसर्जनासाठी मुंबईभर उभारण्यात आलेल्या ३५५ हून अधिक कृत्रिम तलावांची माहिती आणि त्याठिकाणी पोहोचण्याचा अचूक मार्ग आता थेट Google Maps वर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या घराजवळील विसर्जन स्थळ सहज शोधता येणार असून, पारंपरिक चौपाट्यांवरील गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे. नागरिकांनी Google Maps मध्ये “Ganesh Visarjan Artificial Pond” किंवा “BMC Artificial Pond” असे शोधल्यास जवळील कृत्रिम तलावाचे स्थान, तेथील अंतर आणि पोहोचण्याचा मार्ग दिसणार आहे. याशिवाय विसर्जनाच्या दिवशी लाइव्ह ट्रॅफिक अपडेट्सची सुविधाही उपलब्ध असल्याने भाविकांना वाहतूक कोंडी टाळून नियोजनबद्ध प्रवास करता येणार आहे. या उपक्रमामुळे गणेश विसर्जन अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
याशिवाय बीएमसीने नागरिकांसाठी ‘८९९९-२२-८९९९’ हा अधिकृत WhatsApp चॅटबॉट क्रमांकही सुरू केला आहे. या क्रमांकावर ‘Hi’ पाठवून लोकेशन शेअर केल्यास जवळच्या कृत्रिम तलावाची थेट Google Maps लिंक नागरिकांना संदेशाद्वारे पाठवली जात आहे. तसेच शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात विशेष QR Code लावण्यात आले असून, तो स्कॅन करूनही विसर्जन स्थळाचा नकाशा पाहता येणार आहे. यंदा दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले असून, समुद्र आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी शक्य तितक्या प्रमाणात या कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन बीएमसी प्रशासनाने केले आहे. या डिजिटल सुविधेमुळे विसर्जन प्रक्रिया अधिक सुलभ होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत मिळणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.






