पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. परिमंडळ दोनच्या हद्दीतील सात पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावरील ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत संबंधित पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करणे, वास्तव्य करणे, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव, मिरवणुका आणि अन्य सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात शहरातील प्रमुख रस्ते, चौक, मंडई परिसर, गणेश मंडळांच्या परिसरासह विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मिरवणुका आणि देखावे पाहण्यासाठी येणारे नागरिक, भाविकांची गर्दी तसेच विविध कार्यक्रमांमुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणात वर्दळीची होते. या गर्दीचा गैरफायदा घेऊन अनुचित प्रकार घडू नयेत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. बेकायदा शस्त्रांचा वापर, मारहाण, दुखापत, गंभीर दुखापत, धमकी, मालमत्तेचे नुकसान, चोरी, दंगल, दरोड्याची तयारी, जबरी चोरी तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये अभिलेखावर असलेल्या व्यक्तींचा या कारवाईत समावेश आहे. परिमंडळ दोनमध्ये स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ आणि आंबेगाव या सात पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ११५ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी १०४, सहकारनगर आणि आंबेगाव येथे प्रत्येकी १०१, स्वारगेट येथे १००, तर मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख गणेश मंडळे, गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग, चौक आणि संवेदनशील भागांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. गर्दीत संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्याबरोबरच गुन्हेगारी अभिलेखावरील व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू ठेवण्यात येणार आहेत.






